CBSE Class 10 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download

Sample Question Papers for Class 10 Marathi

Review targeted exam resources with the CBSE Class 10 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download. Built according to official CBSE standards for the 2026-27 academic year, these downloadable Class 10 Marathi sample papers support effective revision and performance tracking.

Practice Class 10 Marathi Exam Papers

Access the complete sample paper PDF for Class 10 Marathi below. Regular practice with these targeted mock exams builds familiarity with expected question patterns and chapter weightage to help secure higher marks.

विभाग - 'अ' - वाचन व आकलन - 15 गुण

 

1) खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

संध्याकाळची वेळ. आश्रम शाळेच्या पटांगणात मुले खेळत होती. राजेश मात्र झेंड्याच्या खांबाला टेकून एकटाच बसला होता. त्याच्या आईवर तो रागावला होता. त्याचे वडील - आप्पा - यांनी आज दुपारीच त्याला आश्रमशाळेत पोहोचवलं होतं. पाचवीच्या वर्गात त्याचं नाव घातलं होतं. त्याला यायचं नव्हतं. तो आईला विनवून म्हणाला, "आई... आप्पाला नको म्हणून सांग ना... तुला सोडून मला नाही जायचं शिकायला..." आई त्याच्या पाठीवरून, डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली, "बाळ, तुला खूप मोठं व्हायचं आहे. तू खूप मोठ्ठा साहेब व्हावा, हे आईचं स्वप्नं आहे... बाळ, आईचं स्वप्न पूर्ण नाही करणार? हो ना.. मग त्यासाठी खूप शिकावं लागेल. त्यासाठी आईपासून थोडे दिवस दूर जावं लागेल. तुला काय वाटतं? मी तुझ्यापासून दूर आहे? नाही बाळ, मी सदैव तुझ्याजवळच आहे. माय-लेकरू यांचं नातं चिखल पाण्यासारखं असतं. या दोघांना कधी वेगळं झालेलं पाहिलं आहे? नाही ना..." राजेश पुढे म्हणाला, "आई, मला भाकर चुरून कोण खाऊ घालणार? मला झोपतांना कोण थोपटणार? माझी बाजू कोण घेणार? मला पोटाशी कोण धरणार?" असे अनेक प्रश्न विचारले. आई हसत म्हणाली, "बाळ, शिकून मोठं होण्यासाठी आताच तुला मोठं व्हावं लागेल. आईचं बोट सोडून जगावं लागेल, स्वावलंबी व्हावं लागेल..." "पण आई, मी एकटा कसा राहू?" "तू एकटा कुठे आहेस बाळ!. तुझे दीड-दोनशे भाऊ तुझ्या सोबत असतील... ऊठ बरं... जा खेळायला....." राजेशच्या वर्गातला संतोष त्याला खेळायला बोलवत होता. राजेशला त्याची चूक लक्षात आली. त्याने डोळे पुसले आणि उड्या मारत खेळणाऱ्या मुलांमध्ये गायब झाला.

 

अ) उतारा वाचून त्याआधारे खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडा. (कोणतेही 5) [5 Marks]

 

I. राजेश कुठे बसला होता? [1 Mark]
A) वर्गात
B) वडिलांसोबत
C) झेंड्याच्या खांबाला टेकून
D) झाडाखाली

Answer: C) झेंड्याच्या खांबाला टेकून

Teacher's Note:
a) उताऱ्याच्या सुरुवातीलाच "राजेश मात्र झेंड्याच्या खांबाला टेकून एकटाच बसला होता" असे वाक्य आहे.
b) उत्तर शोधताना प्रश्नातील मुख्य शब्द (बसला होता) उताऱ्यात शोधा.

 

II. राजेश आश्रमशाळेत का आला? [1 Mark]
A) त्याला स्वतःला यायचं होत
B) मित्रांसोबत राहण्यासाठी
C) आई-वडिलांनी शिक्षणासाठी पाठवले
D) खेळायला

Answer: C) आई-वडिलांनी शिक्षणासाठी पाठवले

Teacher's Note:
a) आप्पांनी त्याला आश्रमशाळेत पोहोचवले आणि पाचवीच्या वर्गात त्याचे नाव घातले.
b) "त्याला यायचं नव्हतं" हे वाक्य पर्याय A चुकीचा असल्याचे दाखवते.

 

III. राजेशला आश्रमशाळेत का यायचं नव्हतं? [1 Mark]
A) तिथे अभ्यास कठीण होता.
B) आईपासून दूर राहायचं नव्हतं.
C) मित्र नव्हते.
D) तो आजारी होता.

Answer: B) आईपासून दूर राहायचं नव्हतं.

Teacher's Note:
a) "तुला सोडून मला नाही जायचं शिकायला" या राजेशच्या वाक्यातून कारण स्पष्ट होते.
b) उताऱ्यात नसलेले कारण (अभ्यास कठीण, आजार) निवडू नका.

 

IV. आईच्या मते, राजेशने आश्रमशाळेत का शिकावं? [1 Mark]
A) मित्र मिळावेत म्हणून
B) खेळ चांगला यावा म्हणून
C) आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी
D) सुट्टी मिळावी म्हणून

Answer: C) आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी

Teacher's Note:
a) आई म्हणते, "आईचं स्वप्न पूर्ण नाही करणार? ... मग त्यासाठी खूप शिकावं लागेल."
b) प्रश्नातील "आईच्या मते" हे शब्द महत्त्वाचे आहेत.

 

V. आईने राजेशला काय होण्यासाठी प्रोत्साहन दिलं? [1 Mark]
A) चांगला खेळाडू
B) मोठ्ठा साहेब
C) शेतकरी
D) डॉक्टर

Answer: B) मोठ्ठा साहेब

Teacher's Note:
a) "तू खूप मोठ्ठा साहेब व्हावा, हे आईचं स्वप्नं आहे" असे आई म्हणते.
b) उताऱ्यातील शब्द जसाच्या तसा पर्यायात ओळखा.

 

VI. "माय-लेकरू यांचं नातं चिखल पाण्यासारखं असतं" या वाक्याचा अर्थ - [1 Mark]
A) नातं घट्ट आणि वेगळं न होणारं.
B) नातं कमकुवत आहे.
C) नातं तुटक आहे.
D) नात्यात सतत भांडण असतं.

Answer: A) नातं घट्ट आणि वेगळं न होणारं.

Teacher's Note:
a) चिखल आणि पाणी कधीही वेगळे होत नाहीत, तसेच आई आणि मुलाचे नाते असते.
b) पुढचे वाक्य "या दोघांना कधी वेगळं झालेलं पाहिलं आहे?" अर्थ समजायला मदत करते.

 

ब) खालील प्रश्नांची उत्तरे उताऱ्याच्या आधारे एका वाक्यात लिहा. (कोणतेही 3) (CBQ) [3 Marks]

 

I. राजेश एकटाच का बसला होता? [1 Mark]

Answer: राजेश एकटाच बसला होता, कारण तो आईवर रागावलेला होता.

Teacher's Note:
a) "कारण" हा शब्द वापरून पूर्ण वाक्यात उत्तर लिहा.
b) "आईवर रागावलेला" हा मुख्य मुद्दा आहे.

 

II. राजेशला शेवटी काय जाणवले? [1 Mark]

Answer: राजेशला शेवटी त्याची चूक जाणवली.

Teacher's Note:
a) उताऱ्यात "राजेशला त्याची चूक लक्षात आली" असे वाक्य आहे.
b) उत्तर एकाच पूर्ण वाक्यात लिहा.

 

III. राजेशने आईला कोणकोणते प्रश्न विचारले? [1 Mark]

Answer: "आई, मला भाकर चुरून कोण खाऊ घालणार, मला झोपतांना कोण थोपटणार, माझी बाजू कोण घेणार, मला पोटाशी कोण धरणार?" असे अनेक प्रश्न राजेशने आईला विचारले.

Teacher's Note:
a) उताऱ्यातील सर्व चारही प्रश्न लिहिणे अपेक्षित आहे.
b) प्रश्न अवतरण चिन्हात लिहिल्यास उत्तर अधिक स्पष्ट दिसते.

 

IV. शेवटी राजेश काय केले? [1 Mark]

Answer: शेवटी राजेश डोळे पुसून उड्या मारत खेळणाऱ्या मुलांमध्ये सामील झाला.

Teacher's Note:
a) "खेळणाऱ्या मुलांमध्ये सामील होणे" हा मुख्य मुद्दा आहे.
b) उताऱ्याचे शेवटचे वाक्य नीट वाचा.

 

2) खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

हळूहळू चालत राहिला तो, अंधार दाटला भोवती,
स्वार्थाच्या वादळांनी झाली, मनात खळबळ ती.
तरीही आशेची ठिणगी होती पेटली, अंतरी वारा,
हातात धरून सत्यदीप तो, पुढे चालत होता सारा.
रस्त्यात भेटल्या लोभाच्या, मोहक चमचमती वाटा,
कानात कुजबुजत म्हणाल्या," हेच सुखाचे खरे दाता !"
पण मनातल्या एका आवाजाने, त्याला खरे सांगितले,
"योग्य मार्गच उजळतो जीवन, चुकीचे सारे ढळते."
अखेर प्रकाशाच्या दारी, तो स्वत:ला पोहोचवितो,
सत्य, प्रामाणिकता, परिश्रम - यांतच आनंद शोधितो.
अंधार कितीही दाट असो, सत्याचा दीप जो लावतो,
नीतीच्या वाटेने चालणारा, शेवटीच खरा जिंकतो.

 

अ) कविता वाचून त्यावर आधारित प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. (कोणतेही4) [4 Marks]

 

I. कवितेतील नायकाच्या सभोवती काय होते? [1 Mark]
A) दाटी
B) गर्दी
C) अंधार
D) प्रकाश

Answer: C) अंधार

Teacher's Note:
a) पहिल्या ओळीत "अंधार दाटला भोवती" असे म्हटले आहे.
b) "दाटी" हा शब्द फसवा आहे; ओळीत "दाटला" हे क्रियापद अंधारासाठी वापरले आहे.

 

II. 'आशा' या शब्दाचा विरुद्ध अर्थ खालीलपैकी कोणता? [1 Mark]
A) निराश
B) उदास
C) आनंद
D) निराशा

Answer: D) निराशा

Teacher's Note:
a) 'आशा' हे नाम आहे, म्हणून त्याचा विरुद्धार्थी शब्दही नामच (निराशा) असतो.
b) 'निराश' हे विशेषण आहे; हा सामान्य गोंधळ टाळा.

 

III. कवितेतील नायकाच्या हातात काय आहे? [1 Mark]
A) नंदादीप
B) सत्यदीप
C) दिवा
D) जीवनज्योत

Answer: B) सत्यदीप

Teacher's Note:
a) "हातात धरून सत्यदीप तो" या ओळीत उत्तर आहे.
b) कवितेत वापरलेला नेमका शब्दच निवडा.

 

IV. रस्त्यात भेटलेल्या मोहक व चमचमणाऱ्या कोण? [1 Mark]
A) लोभाच्या वाटा
B) पायवाटा
C) आकर्षक वाटा
D) जीवनवाटा

Answer: A) लोभाच्या वाटा

Teacher's Note:
a) "रस्त्यात भेटल्या लोभाच्या, मोहक चमचमती वाटा" ही ओळ पाहा.
b) 'आकर्षक' हा 'मोहक'चा समानार्थी आहे, पण कवितेतील वाटा 'लोभाच्या' आहेत.

 

V. कवितेतील नायक अखेर कोठे पोहोचतो? [1 Mark]
A) स्वत:च्या घरी
B) प्रकाशाच्या दारी
C) घराच्या अंगणात
D) शेताच्या कुंपणात

Answer: B) प्रकाशाच्या दारी

Teacher's Note:
a) "अखेर प्रकाशाच्या दारी, तो स्वत:ला पोहोचवितो" असे कवितेत आहे.
b) प्रश्नातील "अखेर" हा शब्द कवितेतही आहे; त्या ओळीकडे लक्ष द्या.

 

ब) कवितेच्या आधारे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 3) (CBQ) [3 Marks]

 

I. कवितेतील नायक कशात आनंद शोधतो? [1 Mark]

Answer: कवितेतील नायक सत्य, प्रामाणिकपणा, परिश्रम यात आनंद शोधतो.

Teacher's Note:
a) सत्य, प्रामाणिकपणा आणि परिश्रम हे तीनही मुद्दे लिहा.
b) उत्तर प्रश्नातील शब्द वापरून पूर्ण वाक्यात लिहा.

 

II. जीवनात खरेपणाने कोण जिंकतो? [1 Mark]

Answer: जीवनात नीतीच्या वाटेने चालणारा खरेपणाने जिंकतो.

Teacher's Note:
a) कवितेची शेवटची ओळ या प्रश्नाचे उत्तर देते.
b) "नीतीच्या वाटेने चालणारा" हा मुख्य शब्दसमूह आवश्यक आहे.

 

III. अंधार कितीही गडद असला, तरीही काय केले पाहिजे? [1 Mark]

Answer: अंधार कितीही गडद असला, तरीही हातात सत्याचा दीप घेऊन हळूहळू चालत राहिले पाहिजे.

Teacher's Note:
a) "सत्याचा दीप" हा मुख्य मुद्दा आहे.
b) कवितेतील पहिली आणि शेवटची कडवी जोडून उत्तर लिहा.

 

IV. जीवनात चुकीच्या गोष्टीचे काय होते? [1 Mark]

Answer: जीवनात चुकीच्या गोष्टी ढळतात, म्हणजेच नष्ट होतात.

Teacher's Note:
a) "चुकीचे सारे ढळते" या ओळीतील 'ढळते' शब्दाचा अर्थ 'नष्ट होते' असा लिहा.
b) फक्त 'ढळते' एवढे न लिहिता पूर्ण वाक्य लिहा.

 

V. 'हेच सुखाचे खरे दाता' कोणास म्हटले आहे? [1 Mark]

Answer: रस्त्यातील लोभाच्या चमचमत्या वाटांना 'सुखाचे खरे दाता' म्हटले आहे.

Teacher's Note:
a) हे शब्द लोभाच्या वाटा नायकाच्या कानात कुजबुजतात.
b) 'लोभाच्या वाटा' हा मुख्य शब्द उत्तरात हवा.

 

विभाग - ब - व्याकरण - 20 गुण

 

3. अ) सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 4) [4 Marks]

 

I. गुरुजी फव्यासमोर उभे होते. (अधोरेखित शब्दाची जात ओळखा) [1 Mark]
A) नाम
B) क्रियापद
C) शब्दयोगी अव्यय
D) उभयान्वयी अव्यय

Answer: C) शब्दयोगी अव्यय

Teacher's Note:
a) 'समोर' हा शब्द 'फव्या' या नामाला जोडून आला आहे, म्हणून तो शब्दयोगी अव्यय आहे.
b) शब्दाला जोडून येणारे अव्यय शब्दयोगी; दोन वाक्ये जोडणारे अव्यय उभयान्वयी असते.

 

II. काल दुपारी गारांचा पाऊस पडला. (अधोरेखित शब्दाची जात ओळखा) [1 Mark]
A) सामान्य नाम
B) सर्वनाम
C) क्रियाविशेषण अव्यय
D) क्रियापद

Answer: C) क्रियाविशेषण अव्यय

Teacher's Note:
a) 'काल' हा शब्द पाऊस केव्हा पडला ते सांगतो, म्हणजे क्रियेबद्दल माहिती देतो.
b) क्रिया केव्हा, कोठे, कशी घडली हे सांगणारे शब्द क्रियाविशेषण अव्यये असतात.

 

III. झाडाला खत घातले ....... फुले आली नाहीत. (रिकाम्या जागी योग्य उभयान्वयी अव्यय वापरा) [1 Mark]
A) आणि
B) की
C) पण
D) म्हणजे

Answer: C) पण

Teacher's Note:
a) दोन वाक्यांमध्ये विरोध दाखवायचा आहे, म्हणून 'पण' हे विरोधदर्शक अव्यय योग्य आहे.
b) पूर्ण वाक्य वाचून अर्थ तपासा: झाडाला खत घातले पण फुले आली नाहीत.

 

IV. ............ पुराचे पाणी त्याच्या घरात शिरले. (रिकाम्या जागी योग्य केवलप्रयोगी अव्यय वापरा) [1 Mark]
A) छे !
B) वा!
C) शी!
D) अरेरे!

Answer: D) अरेरे!

Teacher's Note:
a) घरात पुराचे पाणी शिरणे ही दुःखद घटना आहे, म्हणून दुःखदर्शक 'अरेरे!' योग्य आहे.
b) 'वा!' आनंद, 'शी!' तिरस्कार आणि 'छे!' नकार दर्शवतो.

 

V. नेपोलियन अद्वितीय योद्धा होता. (विशेषण ओळखा) [1 Mark]
A) नेपोलियन
B) होता
C) अद्वितीय
D) योद्धा

Answer: C) अद्वितीय

Teacher's Note:
a) 'अद्वितीय' हा शब्द 'योद्धा' या नामाबद्दल विशेष माहिती देतो.
b) नामाचे गुण किंवा वैशिष्ट्य सांगणारा शब्द विशेषण असतो.

 

ब) सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 3) [3 Marks]

 

I. मुलाने पुस्तक वाचले आहे. (भविष्यकाळातील वाक्य तयार करा) [1 Mark]

Answer: मुलगा पुस्तक वाचेल.

Teacher's Note:
a) भविष्यकाळात क्रियापदाला 'ईल / एल' असा प्रत्यय लागतो (वाचेल).
b) कर्ता 'मुलाने' बदलून 'मुलगा' करणे आवश्यक आहे.

 

II. मला मुख्याध्यापकांची भीती वाटत आहे. (काळ ओळखा) [1 Mark]

Answer: वर्तमानकाळ

Teacher's Note:
a) 'वाटत आहे' म्हणजे क्रिया आत्ता चालू आहे, म्हणून हा वर्तमानकाळ आहे.
b) क्रियापदाचे शेवटचे रूप पाहून काळ ओळखा.

 

III. उद्या मी पावसात खेळेल. (भूतकाळातील वाक्य तयार करा) [1 Mark]

Answer: काल मी पावसात खेळले / खेळलो.

Teacher's Note:
a) 'उद्या' हा कालवाचक शब्द बदलून 'काल' करायला विसरू नका.
b) भूतकाळात क्रियापदाला 'ले / लो' असा प्रत्यय लागतो.

 

IV. खालील वाक्यातील भूतकाळी वाक्य शोधा. [1 Mark]
A) रस्ता एकेरीच आहे.
B) रस्ता एकेरीच असेल.
C) रस्ता एकेरीच होता.
D) रस्ता एकेरीच असणार आहे.

Answer: C) रस्ता एकेरीच होता.

Teacher's Note:
a) 'होता' हे क्रियापद भूतकाळ दाखवते.
b) 'आहे' वर्तमानकाळ आणि 'असेल / असणार आहे' भविष्यकाळ दाखवतात.

 

क) सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 3) (CBQ) [3 Marks]

 

I. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? (विधानार्थी वाक्य बनवा) [1 Mark]

Answer: आम्ही तुमचे उपकार कधीही विसरणार नाही.

Teacher's Note:
a) वाक्याचा अर्थ न बदलता प्रश्नचिन्ह काढून विधान करा.
b) विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायला विसरू नका.

 

II. विश्वाचा पसारा अमर्याद आहे. (नकारार्थी वाक्य बनवा) [1 Mark]

Answer: विश्वाचा पसारा मर्यादित नाही.

Teacher's Note:
a) 'अमर्याद' या शब्दाचा विरुद्धार्थी 'मर्यादित' वापरून 'नाही' जोडा.
b) वाक्याचा मूळ अर्थ बदलू नये याची काळजी घ्या.

 

III. अरेरे! केवढ्या जोरात आदळला हा! (वाक्याचा प्रकार ओळखा) [1 Mark]

Answer: केवलप्रयोगी वाक्य / उद्गारार्थी वाक्य.

Teacher's Note:
a) 'अरेरे!' हा उद्गार आणि वाक्याच्या शेवटी उद्गारचिन्ह हे या प्रकाराचे लक्षण आहे.
b) वाक्यातून भावना (दुःख) व्यक्त होते, हे ओळखा.

 

IV. आवडती वस्तू हरवल्यास प्रत्येकाला दुःख होते. (प्रश्नार्थी वाक्य बनवा) [1 Mark]

Answer: आवडती वस्तू हरवल्यास कोणाला दुःख होत नाही?

Teacher's Note:
a) 'प्रत्येकाला' ऐवजी 'कोणाला ... नाही?' वापरल्याने अर्थ तोच राहतो.
b) वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आवश्यक आहे.

 

ड) सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 2) [2 Marks]

 

I. खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता ते ओळखा.
पडवळ, भाज्या, शेंगा, थाळ्या. [1 Mark]

Answer: पडवळ

Teacher's Note:
a) भाज्या, शेंगा, थाळ्या ही अनेकवचनी रूपे आहेत.
b) प्रत्येक शब्दाचे एकवचन (भाजी, शेंग, थाळी) मनात म्हणून तपासा.

 

II. वाहने सावकाश चालली होती. (अधोरेखित शब्दाच्या वचनामध्ये बदल करून वाक्य पुन्हा लिहा) [1 Mark]

Answer: वाहन सावकाश चालले होते.

Teacher's Note:
a) 'वाहने' चे एकवचन 'वाहन' होते.
b) वचन बदलल्यावर क्रियापदही बदलावे लागते (चालली होती - चालले होते).

 

III. 'मिरची' या शब्दाच्या अनेकवचनाचा शब्द लिहा. [1 Mark]

Answer: मिरच्या

Teacher's Note:
a) ईकारान्त स्त्रीलिंगी शब्दांचे अनेकवचन 'या' लागून होते (मिरची - मिरच्या).
b) शुद्धलेखनाकडे लक्ष द्या: 'च्या' असे जोडाक्षर लिहा.

 

4. अ] सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. [कोणतेही 2] [2 Marks]

 

I. खालीलपैकी भिन्नलिंगी शब्दाचा योग्य पर्याय ओळखा. [1 Mark]
A) हिरवळ
B) शेती
C) डोंगर
D) टेकडी

Answer: C) डोंगर

Teacher's Note:
a) हिरवळ, शेती, टेकडी हे स्त्रीलिंगी शब्द आहेत; 'डोंगर' पुल्लिंगी आहे.
b) 'तो / ती / ते' लावून शब्दाचे लिंग तपासा.

 

II. लिंग विचारानुसार गटात न बसणारी शब्द जोडी ओळखा. [1 Mark]
A) दास - दासी
B) रस्ता - रस्ते
C) म्हैस - रेडा
D) युवक - युवती

Answer: B) रस्ता - रस्ते

Teacher's Note:
a) इतर जोड्यांमध्ये लिंगबदल आहे, तर 'रस्ता - रस्ते' मध्ये वचनबदल आहे.
b) प्रश्नातील 'लिंग विचारानुसार' हे शब्द लक्षात घ्या.

 

III. पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? [1 Mark]
A) फळा
B) माणूस
C) गवत
D) वीट

Answer: D) वीट

Teacher's Note:
a) 'ती वीट' असे म्हणतो, म्हणून 'वीट' स्त्रीलिंगी आहे.
b) फळा, माणूस पुल्लिंगी आणि गवत नपुंसकलिंगी आहे.

 

ब] सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 2) [2 Marks]

 

I. समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. [1 Mark]
A) झेंडा - ध्वज
B) अपाय - उपाय
C) स्तंभ -खांब
D) धवल - पांढरे

Answer: B) अपाय - उपाय

Teacher's Note:
a) 'अपाय' म्हणजे हानी आणि 'उपाय' म्हणजे तोडगा; हे समानार्थी नाहीत.
b) प्रश्नात 'अयोग्य' जोडी विचारली आहे, हे नीट वाचा.

 

II. गटात न बसणारा शब्द ओळखा. [1 Mark]
A) सूर्य
B) शशी
C) भास्कर
D) सविता

Answer: B) शशी

Teacher's Note:
a) सूर्य, भास्कर, सविता हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत; 'शशी' म्हणजे चंद्र.
b) प्रत्येक शब्दाचा अर्थ लिहून गट तपासा.

 

III. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? [1 Mark]
A) कामगार
B) कौशल्य
C) कसब
D) निपुणता

Answer: A) कामगार

Teacher's Note:
a) कौशल्य, कसब, निपुणता हे समानार्थी शब्द आहेत; 'कामगार' हा व्यक्तिवाचक शब्द आहे.
b) गटातील समान अर्थ आधी ओळखा, मग वेगळा शब्द निवडा.

 

क] सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 2) [2 Marks]

 

I. खालीलपैकी विरुद्ध शब्दांची योग्य जोडी कोणती? [1 Mark]
A) देव - दानव
B) छोटा- लहान
C) दूर - लांब
D) तिमिर - काळोख

Answer: A) देव - दानव

Teacher's Note:
a) बाकीच्या तीनही जोड्या समानार्थी शब्दांच्या आहेत.
b) विरुद्धार्थी जोडीतील दोन्ही शब्दांचे अर्थ परस्परविरोधी असतात.

 

II. 'आस्था' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? [1 Mark]
A) सहिष्णुता
B) आवश्यकता
C) प्रथा
D) अनास्था

Answer: D) अनास्था

Teacher's Note:
a) 'अन्' हा उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द तयार होतो (आस्था - अनास्था).
b) अशाच प्रकारे 'आदर - अनादर' हा शब्दही लक्षात ठेवा.

 

III. 'आसक्ती' 'या शब्दासाठीचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? [1 Mark]
A) सक्ती
B) आकर्षण
C) जबरदस्ती
D) विरक्ती

Answer: D) विरक्ती

Teacher's Note:
a) 'आसक्ती' म्हणजे ओढ, तर 'विरक्ती' म्हणजे ओढ नसणे.
b) 'आकर्षण' हा समानार्थी शब्द आहे; त्याच्याशी गोंधळ करू नका.

 

ड] सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. (कोणतेही 2) [2 Marks]

 

I. 'त्रैलोक्य' या सामासिक शब्दाचा योग्य समास ओळखा व पर्याय निवडा. [1 Mark]
A) वैकल्पिक द्वंद्व समास
B) अव्ययीभाव समास
C) समाहार द्वंद्व समास
D) द्विगू समास

Answer: D) द्विगू समास

Teacher's Note:
a) 'त्रैलोक्य' म्हणजे तीन लोकांचा समूह; पहिले पद संख्यावाचक आहे.
b) पहिले पद संख्या दाखवून समूहाचा बोध होत असेल तर तो द्विगू समास असतो.

 

II. खालीलपैकी गटाबाहेरचा शब्द कोणता? [1 Mark]
A) प्रतिक्षण
B) आजन्म
C) नवरात्र
D) घरोघरी

Answer: C) नवरात्र

Teacher's Note:
a) प्रतिक्षण, आजन्म, घरोघरी हे अव्ययीभाव समास आहेत; 'नवरात्र' हा द्विगू समास आहे.
b) प्रत्येक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा.

 

III. खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? [1 Mark]
A) पंचपाळे
B) मातापिता
C) दहावीस
D) दररोज

Answer: B) मातापिता

Teacher's Note:
a) 'मातापिता' चा विग्रह 'माता आणि पिता' असा होतो.
b) विग्रह करताना 'आणि, व' ही अव्यये येतात तो इतरेतर द्वंद्व समास; 'किंवा, अथवा' येतात तो वैकल्पिक द्वंद्व.

 

विभाग - 'क' - पाठ्यपुस्तक आधारित - 30 गुण

 

5. अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 3) [3 Marks]

 

I. कादंबरी वाचकांची उत्कंठा कशाप्रकारे वाढवते? [1 Mark]

Answer: कादंबरी अनपेक्षित वळणे घेत घेत वाचकांची उत्कंठा वाढवते.

Teacher's Note:
a) 'अनपेक्षित वळणे' हा मुख्य शब्द उत्तरात आवश्यक आहे.
b) प्रश्नातील शब्द वापरून एकाच पूर्ण वाक्यात उत्तर लिहा.

 

II. डॉ. माशेलकरांच्या आईला त्यांच्या शिक्षणासाठी कोणाकडून मदत मिळाली? [1 Mark]

Answer: डॉ. माशेलकरांच्या आईला त्यांच्या शिक्षणासाठी परिचयातील एका माऊलीकडून मदत मिळाली.

Teacher's Note:
a) 'परिचयातील एका माऊलीकडून' हा शब्दसमूह अचूक लिहा.
b) उत्तराची सुरुवात प्रश्नातील शब्दांनी केल्यास उत्तर पूर्ण वाटते.

 

III. पावडेकाकांची पावले कशी होती? [1 Mark]

Answer: पावडेकाकांची पावले गोजिरी व गुलाबी होती.

Teacher's Note:
a) 'गोजिरी' आणि 'गुलाबी' ही दोन्ही विशेषणे लिहा.
b) एकच विशेषण लिहिल्यास उत्तर अपूर्ण ठरू शकते.

 

IV. शालीन जग गमावून बसण्याचा धोका केव्हा संभवतो? [1 Mark]

Answer: सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोका अधिक संभवतो.

Teacher's Note:
a) 'सन्मान करण्याच्या रूपाने' हा मुख्य मुद्दा आहे.
b) हा प्रश्न 'शाल' या पाठावर आधारित आहे.

 

V. अब्दुल कोणत्या विचाराने हळवा झाला? [1 Mark]

Answer: आयुष्याचं मोल देऊन तनमनधनानं फुलवलेली कर्मभूमी सोडताना दाजीसाहेबांना काय वाटले असेल, या विचाराने अब्दुल हळवा झाला.

Teacher's Note:
a) 'कर्मभूमी सोडताना दाजीसाहेबांना काय वाटले असेल' हा मुख्य मुद्दा आहे.
b) उत्तर लांब असले तरी ते एकाच वाक्यात लिहा.

 

ब]] खालीलपैकी तीन वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्दाचा पर्याय शोधून वाक्य पुन्हा लिहा. (कोणतेही 3) [3 Marks]

 

I. नुसता ---- भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहाणार. [1 Mark]
A) वायू
B) वारा
C) हवा
D) समीर

Answer: A) वायू - नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहाणार.

Teacher's Note:
a) चारही पर्याय समानार्थी आहेत; पाठातील नेमका शब्द 'वायू' आहे.
b) प्रश्नात वाक्य पुन्हा लिहायला सांगितले आहे, म्हणून पूर्ण वाक्य लिहा.

 

II. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा ---- रंग ठरतो. [1 Mark]
A) गोरा
B) गुलाबी
C) निळा
D) काळा

Answer: D) काळा - तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो.

Teacher's Note:
a) कार्बनचे उत्सर्जन जितके जास्त, तितकी पावले काळी, असा पाठाचा आशय आहे.
b) 'गुलाबी' हा पर्याय पावडेकाकांच्या पावलांसाठी आहे; गोंधळ टाळा.

 

III. आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन ---- होता. [1 Mark]
A) आनंदी
B) खूश
C) दुःखी
D) समाधानी

Answer: B) खूश - आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खूश होता.

Teacher's Note:
a) पाठातील मूळ शब्द 'खूश' हाच योग्य पर्याय आहे.
b) 'दुःखी' हा पर्याय वाक्याच्या अर्थाशी जुळत नाही.

 

IV. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही ---- उत्तम होऊ शकत नाही. [1 Mark]
A) गोष्ट
B) कलाकृती
C) कला
D) मालिका

Answer: B) कलाकृती - मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही.

Teacher's Note:
a) 'कोणतीही' या शब्दाशी 'कलाकृती' हा शब्द अर्थाने योग्य जुळतो.
b) भरलेले पूर्ण वाक्य लिहिणे आवश्यक आहे.

 

V. शालीमुळे शालीनता येत असेल तर मी ---- होईन. [1 Mark]
A) कर्जबाजारी
B) भिकारी
C) साहित्यिक
D) लेखक

Answer: A) कर्जबाजारी - शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन.

Teacher's Note:
a) हे वाक्य 'शाल' या पाठातील आहे.
b) पाठातील वाक्ये लक्षपूर्वक वाचल्यास असे प्रश्न सहज सुटतात.

 

क) खालील प्रश्नाचे ४० ते ५० शब्दात उत्तर लिहा. (कोणतेही 1) (CBQ) [3 Marks]

 

I. 'शाल व शालीनता' यांचा पाठाधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा. [3 Marks]

Answer: 'शाल' या पाठात लेखक रा. ग. जाधव यांनी शालीभोवतीच्या आठवणी सांगितल्या आहेत. 'शाल' ही प्रतीकात्मक आहे, तर 'शालीनता' ही चारित्र्यात्मक आहे. एखाद्या व्यक्तीबद्दलचा आदर आपण शाल देऊन प्रकट करतो. त्या व्यक्तीच्या चारित्र्यात दडलेला नम्रपणा म्हणजे शालीनता होय. शालीनता हे चारित्र्याचे एक अंग आहे.

Teacher's Note:
a) 'शाल - प्रतीकात्मक' आणि 'शालीनता - चारित्र्यात्मक' हा फरक स्पष्ट लिहा.
b) पाठाचे नाव आणि लेखकाचे नाव सुरुवातीला दिल्यास उत्तर परिपूर्ण होते.
c) 40 ते 50 शब्दांची मर्यादा पाळा.

 

II. 'तापानं फणफणलीय आपली धरती' ही स्थिती बदलण्यासाठी तुम्ही तीन उपाय सुचवा. [3 Marks]

Answer: 'फूटप्रिंट्स' या पाठात प्रदीप आवटे यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगितले आहे. वाहनांमुळे होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनाने जागतिक तापमान वाढते. ही स्थिती बदलण्यासाठी तीन उपाय:
1. खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा.
2. थोड्या अंतरासाठी सायकल किंवा पायी चालण्याचा पर्याय निवडावा, म्हणजे पेट्रोलचा वापर कमी होईल.
3. झाडे लावून हिरवळ वाढवावी, म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड कमी होऊन हवा शुद्ध राहील.

Teacher's Note:
a) प्रश्नात तीन उपाय विचारले आहेत; ते क्रमांक देऊन स्पष्ट लिहा.
b) प्रत्येक उपायाचा कार्बन कमी होण्याशी संबंध दाखवा.

 

III. निरंजन 'खरा नागरिक' कसा ते स्पष्ट करा. [3 Marks]

Answer: 'खरा नागरिक' या पाठात सुहास बारटक्के यांनी शालेय विषय आचरणात आणायचे असतात, हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून दाखवले आहे. कष्टाळू व प्रामाणिक निरंजनने पुलावर रेल्वेचे रूळ वेडेवाकडे केलेले पाहिले. गाडी येण्यापूर्वीच त्याने स्टेशनकडे धाव घेऊन धोका सांगितला. स्वार्थ बाजूला सारून त्याने सर्वांचा जीव वाचवला, म्हणून तो खरा नागरिक आहे.

Teacher's Note:
a) निरंजनने धोका ओळखून स्टेशनकडे धाव घेतली, हा प्रसंग उत्तरात हवा.
b) शेवटी 'म्हणून तो खरा नागरिक' असा निष्कर्ष स्पष्ट लिहा.

 

ड) खालील वाक्यांतील वाक्प्रचार ओळखा व त्याचा अर्थ कंसातील कोणत्या वाक्प्रचारांशी जुळतो ते लिहा. (CBQ) [5 Marks]
(नौबत झडणे, स्वप्न साकार करणे, आर्जव करणे, उसंत न मिळणे, भान ठेवणे, भिकेला लागणे)

 

I. परीक्षा जवळ आली की, मैदानावर जायला मुक्ताला वेळच मिळत नाही. [1 Mark]

Answer: वेळच मिळत नाही - उसंत न मिळणे

Teacher's Note:
a) 'उसंत' म्हणजे फुरसत किंवा मोकळा वेळ.
b) आधी वाक्यातील शब्दसमूह लिहा, मग जुळणारा वाक्प्रचार लिहा.

 

II. कलेक्टर बनून आनंदने आईबाबांचे स्वप्न पूर्ण केले. [1 Mark]

Answer: स्वप्न पूर्ण केले - स्वप्न साकार करणे

Teacher's Note:
a) 'साकार करणे' म्हणजे प्रत्यक्षात आणणे किंवा पूर्ण करणे.
b) कंसातील वाक्प्रचार मूळ रूपातच लिहा.

 

III. विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेची जाणीव ठेवली पाहिजे. [1 Mark]

Answer: वेळेची जाणीव ठेवली पाहिजे - भान ठेवणे

Teacher's Note:
a) 'भान' म्हणजे जाणीव किंवा लक्ष.
b) 'जाणीव' आणि 'भान' हे समानार्थी शब्द लक्षात ठेवा.

 

IV. बँकेचे कर्ज फेडता फेडता शेतकरी अगदी दरिद्री झाला. [1 Mark]

Answer: दरिद्री झाला - भिकेला लागणे

Teacher's Note:
a) 'भिकेला लागणे' म्हणजे अतिशय गरीब होणे.
b) कंसातील 'नौबत झडणे' हा वाक्प्रचार कोणत्याही वाक्याशी जुळत नाही; तो फसवा पर्याय आहे.

 

V. रस्त्यावर भिक्षेकरी लोकांना पैशांसाठी विनवीत होता. [1 Mark]

Answer: विनवीत होता - आर्जव करणे

Teacher's Note:
a) 'आर्जव करणे' म्हणजे विनवणी करणे.
b) 'भिक्षेकरी' हा शब्द पाहून 'भिकेला लागणे' निवडण्याची चूक टाळा.

 

6. अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे दया. (कोणतेही 4) [4 Marks]

 

I. वणव्यात कोण अडकेल, अशी भीती हरणीला वाटते? [1 Mark]

Answer: वणव्यात पाडस अडकेल, अशी भीती हरणीला वाटते.

Teacher's Note:
a) 'पाडस' म्हणजे हरणीचे पिल्लू; हा मुख्य शब्द आहे.
b) प्रश्नातील शब्द वापरून पूर्ण वाक्य लिहा.

 

II. हरघडी कविवर्य नारायण सुर्वे यांनी काय वाळविले नाही? [1 Mark]

Answer: हरघडी कविवर्य नारायण सुर्वे यांनी अश्रू वाळविले नाही.

Teacher's Note:
a) 'अश्रू' हा एकच शब्द उत्तराचा गाभा आहे.
b) उत्तर एकाच पूर्ण वाक्यात लिहा.

 

III. सैनिकांचे पाऊल कसे आहे? [1 Mark]

Answer: सैनिकांचे पाऊल जिद्दीचे आहे.

Teacher's Note:
a) 'जिद्दीचे' हा मुख्य शब्द आहे.
b) शुद्धलेखन जपा: 'जिद्दीचे' मध्ये 'द्दी' असे जोडाक्षर आहे.

 

IV. उद्योगाचे यंत्र कोणते मंत्र म्हणत आहेत? [1 Mark]

Answer: उद्योगाचे यंत्र श्रमशक्तीचे मंत्र म्हणत आहेत.

Teacher's Note:
a) 'श्रमशक्तीचे मंत्र' हा शब्दसमूह अचूक लिहा.
b) कवितेतील शब्दच उत्तरात वापरा.

 

V. पक्षिणी लगेचच धरणीकडे केव्हा झेपावते? [1 Mark]

Answer: पिल्लू धरणीवर पडायला लागल्यावर पक्षिणी लगेचच धरणीकडे झेपावते.

Teacher's Note:
a) 'केव्हा' या प्रश्नासाठी वेळ किंवा प्रसंग सांगणारे उत्तर द्या.
b) 'पिल्लू धरणीवर पडायला लागल्यावर' हा मुख्य मुद्दा आहे.

 

VI. डोळे भरून पाहावी, अशी दौड कोणती? [1 Mark]

Answer: सैनिकांच्या विजयाची दौड डोळे भरून पाहावी.

Teacher's Note:
a) 'विजयाची दौड' हा मुख्य शब्दसमूह आहे.
b) ही दौड सैनिकांची आहे, हे उत्तरात स्पष्ट लिहा.

 

ब) खालील वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य शब्दाचा पर्याय शोधून वाक्ये पुन्हा लिहा. (कोणतेही 4) [4 Marks]

 

I. अशा --- ज्योतींची तुझ्या मागून राखण. [1 Mark]
A) अमर्याद
B) असंख्य
C) अनंत
D) बेसुमार

Answer: B) असंख्य - अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण.

Teacher's Note:
a) चारही पर्यायांचा अर्थ जवळपास सारखा आहे; कवितेतील नेमका शब्द 'असंख्य' आहे.
b) कवितेच्या ओळी पाठ असल्यास असे प्रश्न लवकर सुटतात.

 

II. ------- मी दास तुझा. [1 Mark]
A) अंकिला
B) सोबतीला
C) भक्तीला
D) सेवेला

Answer: A) अंकिला - अंकिला मी दास तुझा.

Teacher's Note:
a) 'अंकिला' म्हणजे अंकित किंवा अधीन असलेला.
b) कवितेतील जुन्या शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा.

 

III. भाकरीचा चंद्र शोधण्यातच -------- बरबाद झाली. [1 Mark]
A) शेती
B) आयुष्ये
C) जिंदगी
D) दुनिया

Answer: C) जिंदगी - भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

Teacher's Note:
a) 'झाली' हे स्त्रीलिंगी एकवचनी क्रियापद 'जिंदगी' शी जुळते.
b) 'आयुष्ये' अनेकवचनी असल्याने येथे बसत नाही.

 

IV. हजार आम्ही ---- बळकट. [1 Mark]
A) एकी
B) समता
C) एकता
D) बंधुता

Answer: A) एकी - हजार आम्ही एकी बळकट.

Teacher's Note:
a) 'एकी' आणि 'एकता' समानार्थी आहेत; कवितेतील शब्द 'एकी' आहे.
b) कवितेतील मूळ शब्दच निवडा.

 

V. जीव ओवाळावा तरी जीव किती हा ----. [1 Mark]
A) समान
B) सान
C) लहान
D) महान

Answer: C) लहान - जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान.

Teacher's Note:
a) 'सान' आणि 'लहान' समानार्थी आहेत; कवितेतील शब्द 'लहान' आहे.
b) पर्याय निवडल्यावर पूर्ण ओळ पुन्हा लिहा.

 

क) खालीलपैकी एका काव्यपंक्तीचे संदर्भासह स्पष्टीकरण करा. ( कोणतेही 1) (CBQ) [3 Marks]

 

I. 'मातीचे हो मंगल तनमन, चैतन्याचे फिरे सुदर्शन.' [3 Marks]

Answer:
संदर्भ - 'स्वप्नं करु साकार' या कवितेत कवी किशोर पाठक यांनी भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे.
स्पष्टीकरण - कवीने कृषिसंस्कृतीचे महत्त्व पटवून दिले आहे. श्रावण महिन्यात धरती हिरव्या रानांनी, पानाफुलांनी सजलेली असते. शेतकऱ्यांच्या कष्टाने इथली शेते धनधान्याने डोलू लागतात. हे सौंदर्य पाहून सर्वजण आनंदित होतात. जसे सुदर्शनचक्र फिरले की दुःखांचा, अडचणींचा नाश होतो आणि आनंद पसरतो, तसे शेतकरी आपल्या कष्टाने चैतन्याचे, आनंदाचे सुदर्शनचक्र फिरवत असतो. त्यांच्यासह मेहनत करून आपणही धरतीला सुजलाम् सुफलाम् बनवूया.
वैशिष्ट्य - कवितेतून कृषिसंस्कृतीचे सुंदर चित्रण कवीने केले आहे.

Teacher's Note:
a) संदर्भ, स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य हे तीनही भाग स्वतंत्रपणे लिहा.
b) संदर्भात कवितेचे नाव आणि कवीचे नाव आवश्यक आहे.
c) 'सुदर्शन' या प्रतिमेचा अर्थ स्पष्ट केल्यास पूर्ण गुण मिळतात.

 

II. 'काय करावें कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य.' [3 Marks]

Answer:
संदर्भ - 'औक्षण' या कवितेत कवयित्री इंदिरा संत यांनी सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन केले आहे.
स्पष्टीकरण - देशाच्या रक्षणासाठी जवान सीमेवर अहोरात्र शत्रूशी दोन हात करतात, म्हणूनच आपण सुखाने जगतो आणि सण-उत्सव साजरे करतो. कवयित्रीच्या मनात जवानांबद्दल जिव्हाळा, प्रेम आणि आदर आहे. घरातून सीमेवर निघालेल्या जवानाला त्या ओवाळत आहेत. त्या म्हणतात की, माझ्याकडे एवढी शक्ती, सामर्थ्य नाही, त्यामुळे देशासाठी, या सैनिकांसाठी मी काय करावे हे मला कळत नाही.
वैशिष्ट्य - सामान्य माणसाची दुबळी इच्छाशक्ती या काव्यपंक्तीतून व्यक्त होते.

Teacher's Note:
a) संदर्भ, स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य असे तीन भाग करून लिहा.
b) कवयित्रीची असहायता आणि जवानांबद्दलचा आदर हे दोन्ही भाव स्पष्ट करा.

 

7. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 5) (CBQ) [5 Marks]

 

I. 'ताकास तूर लागू न देणे' या वाक्प्रचाराचा कोणता अर्थ व्युत्पत्तीकोशात आला आहे? [1 Mark]

Answer: 'ताकास तूर लागू न देणे' या वाक्प्रचाराचा अर्थ व्युत्पत्तीकोशात एखाद्या गोष्टीचा थांगपत्ता लागू न देणे, गोष्ट लपवून ठेवणे हा आला आहे.

Teacher's Note:
a) 'थांगपत्ता लागू न देणे' आणि 'गोष्ट लपवून ठेवणे' हे दोन्ही अर्थ लिहा.
b) वाक्प्रचार अवतरण चिन्हात लिहा.

 

II. लेखकाने विद्यार्थ्यांना कोणत्या संस्थेतील आपले अनुभव सांगितले आहे? [1 Mark]

Answer: लेखकाने विद्यार्थ्यांना बार्क / भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या संस्थेतील आपले अनुभव सांगितले आहेत.

Teacher's Note:
a) संस्थेचे पूर्ण नाव (भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर) किंवा 'बार्क' हे लघुरूप लिहिले तरी चालते.
b) संस्थेचे नाव अचूक लिहा.

 

III. 'दिवाळी' या शब्दांची व्युत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली आहे? [1 Mark]

Answer: 'दिवाळी' या शब्दाची व्युत्पत्ती 'दीपावलि' या संस्कृत शब्दापासून झाली आहे.

Teacher's Note:
a) मूळ शब्द 'दीपावलि' आणि त्याची भाषा 'संस्कृत' दोन्ही लिहा.
b) दीपावलि म्हणजे दिव्यांची ओळ, हे लक्षात ठेवल्यास उत्तर सहज आठवते.

 

IV. मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागचे कोणते कारण वरिष्ठांनी सांगितले आहे? [1 Mark]

Answer: काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात, हे मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागचे कारण वरिष्ठांनी सांगितले आहे.

Teacher's Note:
a) 'काम सुरू करण्याआधीच मागण्या' हा मुख्य मुद्दा आहे.
b) उत्तर एकाच वाक्यात, प्रश्नातील शब्द वापरून लिहा.

 

V. 'शहाणा' या शब्दाला मूळ अर्थाशिवाय व्युत्पत्तीकोशानुसार अजून कोणता अर्थ प्राप्त झाला आहे? [1 Mark]

Answer: 'शहाणा' या शब्दाला मूळ अर्थाशिवाय व्युत्पत्तीकोशानुसार 'अतिशहाणा' हा अर्थ प्राप्त झाला आहे.

Teacher's Note:
a) 'अतिशहाणा' हा एकच शब्द उत्तराचा गाभा आहे.
b) शब्दांचे अर्थ काळानुसार बदलतात, हे या पाठातून लक्षात घ्या.

 

VI. माणसांतील कोणती प्रवृत्ती गेली पाहिजे, असे डॉ.भाभांनी सांगितले आहे? [1 Mark]

Answer: बॉसने सांगितले तेवढेच काम करायचे आणि काम नसेल तर आपल्याला काही कामच नाही असे समजायचे, माणसांतील ही प्रवृत्ती गेली पाहिजे, असे डॉ. भाभांनी सांगितले आहे.

Teacher's Note:
a) 'सांगितले तेवढेच काम' आणि 'काम नसेल तर काही कामच नाही' हे दोन्ही भाग लिहा.
b) उत्तर लांब असले तरी एकाच वाक्यात लिहा.

 

VII. 'दार' हा प्रत्यय कोणत्या भाषेतील आहे? [1 Mark]

Answer: 'दार' हा प्रत्यय फारसी भाषेतील आहे.

Teacher's Note:
a) 'फारसी' हा एकच शब्द उत्तराचा गाभा आहे.
b) पूर्ण वाक्यात उत्तर लिहा.

 

विभाग - ड - लेखन कौशल्य - 15 गुण

 

8. अ) दिलेले निबंध मुद्दे व कथा मुद्दे नीट वाचा व दिलेल्या पाच विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर 120 - 150 शब्दांत निबंध अथवा कथा लिहा. (कोणतेही 1 ) (CBQ) [5 Marks]

 

निबंधाविषय व मुद्दे

 

I. श्रमाचे महत्त्व
[मुद्दे- श्रम म्हणजे काय?---- श्रमाने मिळणारे जीवनातील यश ----- श्रमाची गरीब व श्रीमंतांना आवश्यकता ---- आळस माणसाचा शत्रू ------ कोणतेही श्रम फुकट जात नाहीत ---- आधी कष्ट मग फळ...... श्रमातच ईश्वराचे दर्शन] [5 Marks]

Answer:

श्रमाचे महत्त्व

शरीराने किंवा बुद्धीने एखादे काम मनापासून करणे म्हणजे श्रम. जगात जे काही सुंदर आणि मोठे उभे आहे, ते श्रमातूनच निर्माण झाले आहे. शेतकरी दिवसरात्र शेतात राबतो, म्हणून आपल्याला अन्न मिळते. विद्यार्थी नियमित अभ्यास करतो, म्हणून त्याला परीक्षेत यश मिळते. जीवनातील प्रत्येक यशाचे मूळ श्रमातच असते.

श्रमाची गरज फक्त गरिबांनाच असते असे नाही. गरिबाला पोट भरण्यासाठी श्रम करावे लागतात, तर श्रीमंताला मिळालेली संपत्ती टिकवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी श्रम आवश्यक असतात. आळस हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. आळशी माणूस संधी असूनही मागे पडतो.

कोणतेही श्रम फुकट जात नाहीत. आज केलेल्या कष्टांचे फळ उद्या नक्की मिळते. म्हणूनच म्हणतात, "आधी कष्ट मग फळ." श्रम करणाऱ्याला समाधान आणि आत्मसन्मान मिळतो. खरे तर श्रमातच ईश्वराचे दर्शन होते. म्हणून प्रत्येकाने श्रमाला प्रतिष्ठा द्यावी आणि कष्टाची कास धरावी.

Teacher's Note:
a) दिलेले सर्व मुद्दे क्रमाने निबंधात यायला हवेत.
b) आकर्षक सुरुवात, परिणामकारक शेवट आणि म्हणींचा योग्य वापर यांना गुण मिळतात.
c) शब्दमर्यादा 120 ते 150 शब्दांची पाळा.

 

II. सूर्य मावळलाच नाही तर.....
[मुद्दे - उजेडच उजेड ---- पृथ्वीचे तापमान वाढेल ----- लोकांच्या वागणुकीत समानता नसेल ----- सजीवांवर घातक परिणाम ----- कालचक्र थांबेल.] [5 Marks]

Answer:

सूर्य मावळलाच नाही तर.....

रोज संध्याकाळी सूर्य मावळतो आणि रात्र होते. पण एक दिवस सूर्य मावळलाच नाही तर? ही कल्पनाच मनात भीती निर्माण करते. सगळीकडे फक्त उजेडच उजेड असेल. रात्रीचा अंधार, चांदण्यांचे आकाश आणि शांत झोप सगळे नाहीसे होईल.

सतत सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत जाईल. नद्या, तलाव आटतील आणि पाण्याची टंचाई निर्माण होईल. कोणी जागे असेल तर कोणी झोपलेले असेल, त्यामुळे लोकांच्या वागणुकीत समानता राहणार नाही. कामाच्या आणि विश्रांतीच्या वेळा ठरवणे कठीण होईल.

उष्णतेमुळे झाडे सुकतील, पशुपक्षी आणि माणसे आजारी पडतील. सर्व सजीवांवर घातक परिणाम होतील. दिवस आणि रात्र यांचे चक्रच संपल्यामुळे कालचक्र जणू थांबेल. म्हणून सूर्याचे उगवणे जितके आवश्यक आहे, तितकेच त्याचे मावळणेही आवश्यक आहे. निसर्गाचा हा समतोल आपण जपला पाहिजे.

Teacher's Note:
a) कल्पनात्मक निबंधात 'जर...तर' ही रचना संपूर्ण निबंधात टिकवा.
b) प्रत्येक मुद्द्याचा परिणाम स्पष्ट करून शेवटी संदेश द्या.

 

III. पृथ्वीचे मनोगत
[मुद्दे - धरती, पृथ्वी अशा विविध नावांनी ओळख ---- एक ग्रह --- वातावरण जीवसृष्टीसाठी आवश्यक ---- दिवस-रात्र तिच्या परिक्रमेने येतात ---- मानवामुळे त्रास ---- प्रदूषणाचे प्रमाण वाढले ---- तिचा नाश तर मानवाचाही नाश ---- तिची रक्षण करण्याची विनंती] [5 Marks]

Answer:

पृथ्वीचे मनोगत

मुलांनो, मी पृथ्वी बोलते आहे. मला तुम्ही धरती, भूमी, वसुंधरा अशा विविध नावांनी ओळखता. सूर्यमालेतील मी एक ग्रह आहे. माझ्याभोवती असलेले वातावरण हे जीवसृष्टीसाठी आवश्यक आहे. त्यामुळेच माझ्यावर झाडे, पशुपक्षी आणि माणसे आनंदाने राहतात.

मी स्वतःभोवती फिरते, म्हणून दिवस आणि रात्र होतात. सूर्याभोवतीच्या माझ्या परिक्रमेमुळे ऋतू बदलतात. मी सर्वांना अन्न, पाणी आणि निवारा देते. पण आज मानवामुळे मला खूप त्रास होत आहे. जंगलतोड, कारखान्यांचा धूर, प्लास्टिकचा कचरा यांमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. माझी हवा, पाणी आणि माती दूषित झाली आहे.

लक्षात ठेवा, माझा नाश झाला तर मानवाचाही नाश होईल. म्हणून तुम्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, झाडे लावा, पाणी वाचवा, प्रदूषण कमी करा आणि माझे रक्षण करा. मी सुरक्षित राहिले तरच तुमचे भविष्य सुरक्षित राहील.

Teacher's Note:
a) आत्मकथनात्मक निबंध प्रथमपुरुषी (मी) रूपात सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहा.
b) शेवटी पृथ्वीच्या रक्षणाची विनंती भावपूर्ण शब्दांत मांडा.

किंवा

कथाविषय व मुद्दे - शीर्षक व तात्पर्य आवश्यक

 

I. एक गावकरी ----- तीर्थयात्रेला जाणे ----- स्वतःजवळचे दागिने शेजारील सावकाराकडे देणे ---- गावकरी परत आल्यावर सावकाराचा दागिने देण्यास नकार ---- "दागिने उंदरांनी खाल्ले"----- गावकऱ्याने सावकाराच्या मुलाला लपवणे ----- "फुलपाखराने नेले" ----- सावकाराने चूक कबूल करणे ---- तात्पर्य [5 Marks]

Answer:

जशास तसे

एका गावात रामू नावाचा एक साधा गावकरी राहत होता. एकदा त्याने तीर्थयात्रेला जायचे ठरवले. घरात दागिने सुरक्षित राहणार नाहीत, म्हणून त्याने स्वतःजवळचे दागिने शेजारी राहणाऱ्या सावकाराकडे ठेवायला दिले.

काही महिन्यांनी रामू यात्रा करून परत आला. तो दागिने परत घेण्यासाठी सावकाराकडे गेला. सावकार मात्र लबाड होता. तो म्हणाला, "अरे रामू, तुझे दागिने तर उंदरांनी खाल्ले!" हे ऐकून रामू चकित झाला, पण काहीच बोलला नाही.

दुसऱ्या दिवशी सावकाराचा मुलगा रामूच्या घराजवळ खेळत होता. रामूने त्याला आपल्या घरात लपवून ठेवले. सावकार मुलाला शोधत आला. रामू शांतपणे म्हणाला, "तुमच्या मुलाला तर फुलपाखराने नेले!" सावकार रागावून म्हणाला, "फुलपाखरू एवढ्या मोठ्या मुलाला कसे नेईल?" रामू हसून म्हणाला, "उंदीर दागिने खाऊ शकतात, तर फुलपाखरू मुलाला का नेणार नाही?" सावकाराला आपली चूक कळली. त्याने चूक कबूल केली आणि रामूचे दागिने परत केले. रामूनेही त्याचा मुलगा परत केला.

तात्पर्य - जशास तसे वागले की लबाड माणसाला धडा मिळतो.

Teacher's Note:
a) कथेला समर्पक शीर्षक आणि शेवटी तात्पर्य लिहिणे आवश्यक आहे.
b) संवादांमुळे कथा रंजक होते; अवतरण चिन्हांचा योग्य वापर करा.
c) दिलेले सर्व मुद्दे क्रमाने कथेत यायला हवेत.

 

II. एक कोल्हा ---- निळ्या पाण्याच्या हौदात पडतो ----- संपूर्ण अंग निळे ----- काय करावे याचा विचार ---- युक्ती योजतो ----- जंगलात जातो ----- सर्व प्राण्यांना सांगतो, "देवाने मला तुमचा राजा म्हणून पाठविले आहे." ---- ओरडू लागतो ----- ते ओरडणे ऐकून ---- कोल्हा ओरडतो ---- शेवटी गुपित उघडकीस येते ----- सर्वांना आनंद ----- पळून जातो ---- तात्पर्य [5 Marks]

Answer:

निळा कोल्हा

एका जंगलात एक भुकेला कोल्हा राहत होता. अन्न शोधत तो एकदा गावात शिरला. कुत्रे मागे लागल्याने तो धावत सुटला आणि एका रंगाऱ्याच्या निळ्या पाण्याच्या हौदात पडला. बाहेर आला तेव्हा त्याचे संपूर्ण अंग निळे झाले होते.

आता काय करावे, याचा तो विचार करू लागला. मग त्याने एक युक्ती योजली. तो जंगलात गेला आणि सर्व प्राण्यांना गोळा करून म्हणाला, "देवाने मला तुमचा राजा म्हणून पाठविले आहे." त्याचा विचित्र निळा रंग पाहून सर्व प्राणी घाबरले आणि त्याला राजा मानू लागले. कोल्हा मजेत राहू लागला.

एका रात्री जंगलातील इतर कोल्हे ओरडू लागले. ते ओरडणे ऐकून निळ्या कोल्ह्यालाही राहवले नाही आणि तोही जोरात ओरडू लागला. शेवटी त्याचे गुपित उघडकीस आले. हा राजा नसून एक साधा कोल्हा आहे, हे समजताच सर्व प्राण्यांना आनंद झाला. ते त्याच्यावर धावून गेले आणि कोल्हा जीव वाचवून पळून गेला.

तात्पर्य - खोटेपणा फार काळ टिकत नाही; कधी ना कधी सत्य उघडकीस येतेच.

Teacher's Note:
a) शीर्षक, आकर्षक प्रारंभ, समर्पक शेवट आणि तात्पर्य हे कथेचे आवश्यक भाग आहेत.
b) कथा भूतकाळात आणि ओघवत्या भाषेत लिहा.

 

ब) खालील विषयावर पत्र लिहा. (लिफाफा आवश्यक) (कोणतेही 1) (CBQ) [5 Marks]

 

I. कल्पेश / कल्पना गोगटे, लोकमान्य टिळक विद्यालय, धामणगाव, येथून शालेय प्रतिनिधी या नात्याने, मा. आगार प्रमुख, राज्य परिवहन मंडळ, धामणगाव यांना पत्र लिहून शाळेच्या सहलीसाठी बस उपलब्ध करून देण्याविषयी मागणी करणारे पत्र लिहितो / लिहिते. [5 Marks]

Answer: दिनांक: 15 डिसेंबर 2026

प्रति,
मा. आगार प्रमुख,
राज्य परिवहन मंडळ,
धामणगाव.

विषय: शाळेच्या सहलीसाठी बस उपलब्ध करून देण्याबाबत.

माननीय महोदय,
मी कल्पेश / कल्पना गोगटे, लोकमान्य टिळक विद्यालय, धामणगाव येथील शालेय प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहित आहे. आमच्या विद्यालयातर्फे दिनांक 10 जानेवारी 2027 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची एकदिवसीय शैक्षणिक सहल आयोजित केली आहे. सहलीत 90 विद्यार्थी व 6 शिक्षक सहभागी होणार आहेत. यासाठी आम्हाला राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसेसची आवश्यकता आहे.

तरी सदर दिवशी सकाळी 7 वाजता विद्यालयाच्या प्रांगणात दोन बसेस उपलब्ध करून द्याव्यात, ही नम्र विनंती. भाड्याची रक्कम नियमानुसार आगाऊ भरण्यात येईल. आपण सहकार्य कराल, अशी खात्री आहे.

आपला / आपली विश्वासू,
कल्पेश / कल्पना गोगटे
शालेय प्रतिनिधी,
लोकमान्य टिळक विद्यालय,
धामणगाव.

लिफाफा:
प्रति,
मा. आगार प्रमुख,
राज्य परिवहन मंडळ,
धामणगाव.
प्रेषक:
कल्पेश / कल्पना गोगटे,
शालेय प्रतिनिधी,
लोकमान्य टिळक विद्यालय,
धामणगाव.

Teacher's Note:
a) गुण विभागणी: दिनांक व मायना - 1, विषय - 0.5, मजकूर - 2, शेवट व समारोप - 0.5, लिफाफा - 1.
b) दोन्ही पत्ते, दिनांक आणि विषय पत्राच्या डाव्या बाजूलाच लिहा.
c) लिफाफा आवश्यक आहे; तो लिहिला नाही तर 1 गुण जातो.

 

II. प्रथमेश / प्रतिमा पांचाळ, विद्यार्थी प्रतिनिधी, शाहू महाराज विद्यालय, सोलापूर. हा / ही मा. व्यवस्थापक, मयूर स्पोर्ट्स, विश्वास कॉलनी, सोलापूर. विद्यालयाकरिता मागवलेले क्रीडासाहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार करणारे पत्र लिहितो/लिहिते. [5 Marks]

Answer: दिनांक: 15 डिसेंबर 2026

प्रति,
मा. व्यवस्थापक,
मयूर स्पोर्ट्स,
विश्वास कॉलनी,
सोलापूर.

विषय: निकृष्ट दर्जाच्या क्रीडासाहित्याबाबत तक्रार.

माननीय महोदय,
मी प्रथमेश / प्रतिमा पांचाळ, शाहू महाराज विद्यालय, सोलापूर येथील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहित आहे. आमच्या विद्यालयाने आपल्या दुकानातून क्रिकेटच्या बॅट, फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची जाळी असे क्रीडासाहित्य मागवले होते. परंतु मिळालेले साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. दोन बॅटना तडे गेले आहेत, फुटबॉलची शिवण उसवली आहे आणि जाळी पहिल्याच आठवड्यात फाटली आहे.

तरी सदर साहित्य परत घेऊन त्याऐवजी चांगल्या दर्जाचे साहित्य लवकरात लवकर पाठवावे, ही विनंती. अन्यथा आम्हाला पुढील खरेदीबाबत वेगळा विचार करावा लागेल.

आपला / आपली विश्वासू,
प्रथमेश / प्रतिमा पांचाळ
विद्यार्थी प्रतिनिधी,
शाहू महाराज विद्यालय,
सोलापूर.

लिफाफा:
प्रति,
मा. व्यवस्थापक,
मयूर स्पोर्ट्स,
विश्वास कॉलनी,
सोलापूर.
प्रेषक:
प्रथमेश / प्रतिमा पांचाळ,
विद्यार्थी प्रतिनिधी,
शाहू महाराज विद्यालय,
सोलापूर.

Teacher's Note:
a) तक्रार पत्रात साहित्यातील दोष नेमकेपणाने आणि नम्र पण ठाम भाषेत लिहा.
b) मजकूर विषयाशी संबंधित, त्रोटक आणि मुद्देसूद असावा.
c) लिफाफा आवश्यक आहे; त्याला 1 गुण आहे.

 

क) खालील दिलेल्या विषयावर जाहिरातलेखन करा. (कोणतेही 1) (CBQ) [5 Marks]

 

I. पर्यटक निवासाची जाहिरात तयार करा. [5 Marks]

Answer:
सुट्टी आनंदात घालवायची आहे? मग चला...
निसर्गरम्य 'सह्याद्री पर्यटक निवास'
डोंगरदऱ्यांच्या कुशीत, शांत आणि सुरक्षित मुक्काम!
आमची वैशिष्ट्ये:
1. स्वच्छ, हवेशीर आणि वातानुकूलित खोल्या
2. घरगुती चवीचे शाकाहारी व मांसाहारी जेवण
3. मुलांसाठी खेळाचे मैदान आणि जलतरण तलाव
4. जवळच्या पर्यटनस्थळांसाठी वाहनाची सोय
5. कुटुंब व शालेय सहलींसाठी विशेष सवलत
आगाऊ नोंदणी करा आणि 20% सवलत मिळवा!
संपर्क: सह्याद्री पर्यटक निवास, महाबळेश्वर. दूरध्वनी: 98XXXXXXXX
"एकदा या, पुन्हा पुन्हा याल!"

Teacher's Note:
a) जाहिरातीत आकर्षक मजकूर, साधी व ओघवती भाषा आणि विश्वासार्हता हवी.
b) घोषवाक्य आणि संपर्क पत्ता दिल्याने जाहिरात वाचकांशी संवाद साधते.

 

II. नवीन वर्षानिमित्ताने शाळेत रक्तदान शिबीर होणार असल्याने त्याची जाहिरात तयार करा. [5 Marks]

Answer:
रक्तदान हेच श्रेष्ठदान!
नवीन वर्षाचा संकल्प करा, रक्तदान करून जीव वाचवा!
भव्य रक्तदान शिबीर
आयोजक: क ख ग विद्यालय
दिनांक: 1 जानेवारी 2027
वेळ: सकाळी 9 ते दुपारी 3
स्थळ: विद्यालयाचे सभागृह
1. 18 ते 60 वयोगटातील निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतात.
2. तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी.
3. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व अल्पोपाहार.
तुमच्या एका रक्ताच्या थेंबाने कोणाला नवे जीवन मिळू शकते.
संपर्क: मुख्याध्यापक, क ख ग विद्यालय. दूरध्वनी: 98XXXXXXXX
"चला, नवे वर्ष माणुसकीने साजरे करूया!"

Teacher's Note:
a) दिनांक, वेळ, स्थळ आणि आयोजक ही माहिती स्पष्ट द्या.
b) वेचक, अर्थपूर्ण घोषवाक्य जाहिरात प्रभावी बनवते.

Exam Preparation Sample Paper for Class 10 Marathi CBSE Class 10 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download

Download Sample Paper: CBSE Class 10 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download (Class 10 Marathi)

Review model practice papers for Class 10 Marathi. Working through the CBSE Class 10 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download under simulated test conditions at home ensures complete familiarity with upcoming school evaluations.

Maximize Your Scores with Model Papers

  • Curriculum Insights: Clarify chapter-wise weightage rules and question trends across Class 10.
  • Gap Analysis: Check performance drops across sets to isolate specific Class 10 Marathi topics needing extra attention.
  • Time Efficiency: Working through objective and descriptive problems builds critical pacing to finish exams comfortably.

Steps to Follow After Completing CBSE Class 10 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download

  1. Self-Evaluation: Score your answers using official guidance to track your academic progress.
  2. Mistake Correction: Class 10 pupils must re-solve questions answered incorrectly to master the correct method.
  3. Continuous Practice: Take additional Marathi sample modules online to maximize preparedness for CBSE evaluations.

FAQs

Where can I download the PDF for CBSE Class 10 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download?

You can download the complete PDF for CBSE Class 10 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download for free from StudiesToday.com. Our resources for Class 10 Marathi are updated for the latest academic session and follow the official exam pattern.

Are solutions provided for CBSE Class 10 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download?

Yes, CBSE Class 10 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download comes with detailed, teacher-verified solutions. We have provided step-by-step answers for Marathi to help students of Class 10 understand correct methodology and marking scheme.

How can practicing CBSE Class 10 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download help in exam preparation?

Practicing this Marathi paper helps in time management and identifying important topics. For Class 10, solving mock papers is the best way to gain confidence and reduce exam-day anxiety.

Is the CBSE Class 10 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download accessible on mobile and tablets?

Yes, all our study materials for Class 10 Marathi are provided in a mobile-friendly PDF format. You can easily download CBSE Class 10 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download on your mobile device.